यवतमाळ : पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळमध्ये घडली. यवतमळमधील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहातील गुरुवारी (7 एप्रिल) दुपारी ही घटना घडली. प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पत्नीच्या सत्कार सोहळ्यादरम्यान पतीला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. विकास महाजन (रा. आर्णी नाका परिसर, यवतमाळ) असं मृत पतीचं नाव आहे. डॉ. रेखा महाजन या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्राचार्य होत्या. तर त्यांचे पती विकास महाजन हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी होते.

यवतमाळच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पत्नी डॉ. रेखा महाजन यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात सुरु असतानाच अचानक विकास महाजन यांना भोवळ आली आणि तिथेच ते गतप्राण झाले. या प्रसंगाने शेकडो उपस्थितांचे मन हेलावून टाकलं. 

डॉ. रेखा महाजन या गेल्या काही वर्षांपासून इथल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डायट) प्राचार्य होत्या. 31 मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (7 एप्रिल) त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ. रेखा महाजन आणि त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास महाजन यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शनपर भाषणही केले. भाषणानंतर ते मंचावर बसलेले असतानाच अचानक भोवळ येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

यावेळी महाजन दाम्पत्याच्या दोन मुली, मुलगा कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे, आजी आणि आजोबांचा सत्कार पाहण्यासाठी त्यांची नातवंडेही आली होती. मात्र सत्काराच्या आनंद सोहळ्यात सर्वांच्या डोळ्यादेखत विकास महाजन यांचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण ‘डायट’ची यंत्रणा आणि महाजन कुटुंब शोकसागरात बुडालं.

हे ही वाचा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here