नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात नॅशनल असेंब्लीत आणलेला अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion Against Imran Khan) फेटाळण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला. मात्र विरोधी पक्षाने याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेल्या नाजूक संबंधांच्या पार्श्वभूमीवर तेथील घडामोडी भारताच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या घडामोडींबाबत आता भारताच्या परराष्ट्र खात्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
इम्रान खान यांच्या मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले आणि विरोधकांनी खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान अशक्य दिसत असल्याने इम्रान खान यांनी राजकीय खेळी केली आणि नॅशनल असेंब्लीत उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर राष्ट्रपतींनी संसद विसर्जित केली. मात्र ही कृती बेकायदेशीर असल्याचं सांगत विरोधकांनी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. विरोधकांच्या याचिकेवर काही दिवस सुनावणी केल्यानंतर अखेर न्यायालयाने उपसभापतींचा निर्णय रद्द ठरवत अविश्वास प्रस्तावावर ९ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची जाणार आहे.
‘शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई लढणार’
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय अडचणी वाढलेल्या असताना इम्रान खान यांनी आज कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. तसंच आज ते देशाला संबोधितही करणार आहे. मी शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढाई लढणार, असं खान यांनी म्हटलं आहे.