यावेळी किरीट सोमय्या यांनी विक्रांत आंदोलन हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीवार्दाने सुरु झाल्याचे सांगत शिवसेनेलाही या वादात खेचले. किरण पैगणकर या व्यक्तीने सेव्ह विक्रांत ही मोहीम सुरु केली. मी त्यावेळी मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो. मी केवळ त्याला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही या आंदोलनाचे समर्थन केले होते. यानंतर मी माझ्या काही सहकाऱ्यांसह या अभियानासाठी पैसे गोळा करायला रेल्वे स्थानकावर गेलो होतो. पण ती एक केवळ प्रतिकात्मक कृती होती, असे सांगत किरीट सोमय्या यांनी आपली बाजू लावून धरली. मात्र, विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठीच्या अभिनयानाच्या माध्यमातून नेमके किती पैसे जमा झाले होते आणि ते कोणाला देण्यात आले होते, यावर किरीट सोमय्या यांनी कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिले नाही.
त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र होते. दोन्ही पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी त्यावेळी राष्ट्रपतींना भेटले होते, याची नोंद माझ्याकडे आहे. मी त्यावेळी सामान्य माणूस होतो, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
५८ कोटी रुपयांच्या आकड्याबाबत संजय राऊत यांनाच विचारा: सोमय्या
सेव्ह विक्रांत अभियानच्या माध्यमातून जमवलेले ५८ कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी हडप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना या अभियानातून खरंच इतके पैसे जमले होते का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, किरीट सोमय्या यांनी हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांनाच विचारा, असे म्हटले. ५८ कोटी रुपयांच आकडा कुठून आला,त्याचे पुरावे संजय राऊत यांच्याकडे आहेत का, हे संजय राऊत सांगू शकतील. ‘सेव्ह विक्रांत’ अभियानाच्या पैशांमध्ये अपहार झाल्याचं ब्रह्मज्ञान संजय राऊत यांना ११ वर्षांनी झालं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात केवळ ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुरावा असल्याशिवाय या कलमाखाली गुन्हा दाखल होऊच शकत नाही. त्यामुळे आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना घेरणार, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला.