मुंबई : आयपीएल खेळत असताना युजवेंद्र चहलबाबत एक भयंकर किस्सा घडला. दारु पिऊन एका खेळाडूने चहलला थेट १५व्या मजल्याच्या बाल्कनीवर नेले आणि तिथे त्याला लटकवले होते. यावेळी नेमकं घडलं तरी काय होतं, ते चहलने एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.
चहलने यावेळी सांगितले की, ” हा किस्सा २०१३ सालचा आहे. त्यावेळी मी मुंबई इंडियन्सकडून खेळायचो. त्यावेळी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये बंगळुरुमध्ये सामना होता. हा सामना झाल्यावर सर्व खेळाडूंसाठी बंगळुरुमध्ये एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीमध्ये सर्व खेळाडू मजा करत होते. या पार्टीत एका खेळाडूला दारु जास्त झाली होती. तो बराच वेळ माझ्याकडे पाहत होता. थोड्या वेळाने त्याने मला बोलवले. त्यानंतर मला घेऊन तो १५ व्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये गेला आणि मला लटकवलं. त्यावेळी माझं नेमकं काय होणार, या भितीने मी घाबरलो होते. कारण मी जर हात सोडला असता तर १५व्या मजल्यावरून मी खाली पडलो असतो. त्यावेळी तिथे काही माणसं जमली आणि त्यांनी मला सोडवलं. जेव्हा माझी सुटका झाली तेव्हा मला हायसं वाटलं. काही वेळातच स्वर्गाला हात लावून आल्यासारखं मला वाटलं. त्यावेळी मी सर्वात जास्त घाबरलो होतो. हा किस्सा आयपीएल खेळतानाच घडला, पण हे माझ्याबरोबर कोणी केलं, त्याचं नाव मात्र मी तुम्हाला सांगणार नाही.”

चहल आयपीएलमध्ये सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. त्यानंतर त्याची निवड आरसीबीच्या संघाने केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो बराच काळ आरसीबीच्या संघाकडून खेळला. त्यानंतर आता यावर्षी झालेल्या मोठ्या लिलावात चहलला राजस्थान रॉयल्सच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे. राजस्थानच्या संघातील आर. अश्विन यावेळी चहल आणि करुण नायर या दोघांनी मुलाखत घेत होता. त्यावेळी चहलने हा भयानक किस्सा सर्वांना सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here