मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आज ‘क्राइम कॉन्फरन्स’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांसह (Home Minister Dilip Walse Patil) राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. या परिषदेत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

‘आजच्या क्राइम कॉन्फरन्समध्ये राज्यात मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसंच राज्यासमोर आगामी काळात कोणते प्रश्न उभे राहू शकतात, याचं गुप्तचर यंत्रणेकडून सादरीकरण करण्यात आलं आहे,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसंच राज्यात पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्यासाठी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना काही सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut vs Kirit somaiya: संजय राऊतांच्या हाती लागलं ‘ते’ जुनं ट्विट, किरीट सोमय्या अडचणीत सापडणार?

राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले गृहमंत्री?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ‘दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. पोलिसांनाही याबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असं वळसे पाटील म्हणाले.

‘पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न’

राज्यात मागील काही महिन्यांमध्ये मंदिरे खुले करणे, मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न, आरक्षणासाठीचं आंदोलन या माध्यमातून काही लोक पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी नागरिकांसोबत कसं वर्तन करावं, याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here