‘सिल्व्हर ओक’ तणाव: घटनेनंतर गृहमंत्री आक्रमक; कडक कारवाईचे संकेत – st empolyee agitation against sharad pawar silver oak home minister dilip walse patil aggressive reaction updates
मुंबई : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाने आज आक्रमक वळण घेतल्याचं पाहायला मिळालं. आंदोलक कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि जोरदार निदर्शने केली. यावेळी काही लोकांकडून चप्पल आणि दगडफेकीचाही प्रयत्न झाला. या सर्व गोंधळानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत घटनेवर भाष्य केलं आहे. (Home Minister Dilip Walse Patil)
‘सिल्व्हर ओकवर दाखल झालेले आंदोलक खरे होते की नाही, हे तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र राज्यात अशांतत निर्माण करण्याचा आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासना आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या ५० -६० वर्षात अशी घटना घडली नव्हती. हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला असून अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत,’ असा इशारा गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे.
‘एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत.आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये,’ असं आवाहनही गृहमंत्र्यांनी एसटी आंदोलकांना केलं आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ इथं दाखल झाले असून ते पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.