मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजीसह जोरदार निदर्शने केली. यावेळी शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन केलं, मात्र सुळे यांच्या या आवाहनाचा काहीही परिणाम झाला नाही. या आंदोलनावेळी चप्पल आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचंही सांगण्यात येत आहे. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. मात्र राजधानी मुंबईत शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या घरासमोर घडलेल्या या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Msrtc Strike In Maharashtra)

‘सिल्व्हर ओक’समोरील राड्यामागे कोणाचा हात?

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप गुंडाळून २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आणि कर्मचाऱ्यांच्या उरली-सुरली आशाही संपुष्टात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, या मागणीसाठी संपावर होते. मात्र आधी राज्य सरकार आणि नंतर न्यायालयाने विलीनीकरणाबाबत नकारात्मक निर्णय दिल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. उच्च न्यायालयाने कामावर रुजू होण्यासाठी अल्टीमेटम दिल्यानंतर हे आंदोलक शरद पवार यांच्याविरोधात अचानक आक्रमक कसे झाले? असा सवाल आत विचारला जात आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी याआधी अनेकदा विलीनीकरणाची मागणी मान्य न होण्यासाठी शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतरही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सावध भूमिका घेत या राड्याप्रकरणी थेट कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं आहे. आजच्या घटनेमागे अज्ञात शक्तींचा हात असल्याचं सांगत तपासानंतरच हल्ल्याच्या सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट होईल, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या तपासाअंती काय खुलासा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sanjay Raut: एसटी आंदोलकांना कोणीतरी चिथावलंय, अज्ञात शक्तीकंडून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न: राऊत

पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

संपाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. राज्य सरकारने वेतनासह विविध मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवल्यानंतरही संप मागे घेण्यास या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. कारण हे संपकरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. मात्र सरकारनंतर न्यायालयातही या कर्मचाऱ्यांची निराशा झाली. त्यामुळे अनेक महिने आपला संसार उघड्यावर सोडून एसटीच्या विलीनीकरणाकडे डोळे लावून मुंबईत बसलेले कर्मचारी आक्रमक होणार, हे स्पष्ट होतं. मात्र असं असतानाही पोलीस प्रशासन आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला याचा थांगपत्ताही नव्हता का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कारण आक्रमक झालेले एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलीस जागे झाले आणि जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न करू लागल्याचं दृष्य पाहायला मिळालं. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांच्या कारभाराविषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे.

‘सिल्व्हर ओक’ तणाव: घटनेनंतर गृहमंत्री आक्रमक; कडक कारवाईचे संकेत

एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत का झाला?

साधारण नोव्हेंबर महिन्यात राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे सरकारच्या आश्वासनानंतर हा संप मिटेल, अशी शक्यता सुरुवातीच्या काळात व्यक्त करण्यात येत होती. मात्र यावेळी एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या निश्चयानेच मैदानात उतरले होते. त्यामुळे सरकारने अनेकदा चर्चा केल्यानंतर आणि अन्य मागण्यांबाबत आश्वासने दिल्यानंतरही संपकरी मागे हटले नाहीत. या काळात कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली. तसंच नैराश्यातून काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं. या सर्व घटनाक्रमामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढतच गेला. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवालही विधानसभेत मांडला. त्यानंतर आता न्यायालयाने कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्याने शेवटची आशा मावळली आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

शरद पवार आणि अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

या घटनेनंतर शरद पवार आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, मात्र त्यांच्या चुकीच्या नेतृत्वाच्या सोबत नाही. गेल्या ५० वर्षांपासून मी या कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला हजेरी लावत आहे. मात्र आता काही लोक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असून त्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावत आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

दुसरीकडे, सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांनंतर गुणरत्न सदावर्ते यांनीही आपली बाजू मांडली. घटना घडली तेव्हा मी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या कामकाजात व्यस्त होतो, तिथून बाहेर पडल्यानंतर मला याबाबत माहिती मिळाली. कष्टकऱ्यांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा पलटवार सदावर्ते यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here