मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. मात्र, कोणालाही पत्ता लागून न देता सिल्व्हर ओकपर्यंत एसटी आंदोलकांचा इतका मोठा जमाव पोहोचलात कसा, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना म्हणजे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे ढळढळीत अपयश असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर सध्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहे. एसटी आंदोलकांना सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी कोणी प्रवृत्त केले, याचा सध्या शोध घेतले जात आहे.

या तपासादरम्यान सिल्व्हर ओकवरील हल्ल्यासाठी सोशल मीडियावर चिथावणी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते , त्यांची पत्नी जयश्री आणि त्यांच्या मुलीचे छायाचित्रे असलेल्या फलकाची छायाचित्रे सोशल मीडियावरून शुक्रवारी सकाळी प्रसारित झाली. या फलकावर ‘सावधान शरद, सावधान शरद, सावधान शरद’ असा मजकूर होता. त्याचबरोबर ‘एसटी कर्मचाऱ्यांचे गिरणी कामगारांप्रमाणे हाल होतील असे म्हणणाऱ्यांची जीभ झडेल हो!’, असेही लिहण्यात आले होते. हा फलक सोशल मीडियावर कोणी व्हायरल केला, याचा गुणरत्न सदावर्ते यांच्याशी काही संबंध आहे का, या सगळ्याचा सध्या शोध घेतला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं

कालच्या घटनेनंतर पोलिसांनी एसटी आंदोलकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पहाटे चार वाजता पोलिसांनी एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढायला सुरुवात केली. पोलिसांनी आता आझाद मैदान पूर्णपणे रिकामे केले आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी आंदोलनक आता जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर ठिय्या देऊन बसले आहेत.
MSRTC Strike: एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, जमावाचा सीएसएमटी स्थानकावर ठिय्या

गुणरत्न सदावर्ते आणि एसटी आंदोलकांना कोर्टात हजर करणार

गुणरत्न सदावर्ते यांच्यासह सिल्व्हर ओकवर धडक देणाऱ्या १०३ एसटी आंदोलकांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार का, हे पाहावे लागेल. सदावर्ते यांच्यावर कलम १०७, १२० ब (कट रचणे), १३२, १४२, १४३, १४५, १४७, १४८, ३३२, ३३३, ३५३, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे कलम ३५३, ४४८, ४५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here