मुंबई: आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर ठिय्या देऊन बसलेल्या एसटी आंदोलकांना आता येथूनही हुसकावण्यात आले आहे. एसटी आंदोलक (ST employees) पहाटे पाचपासून सीएसएमटी स्थानकावर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, आता रेल्वे पोलीस आणि तिकीट तपासनीसांनी (TC) याठिकाणी येत आंदोलकांना तिकीटाबद्दल विचारणा केली. तुमच्याकडे रेल्वे तिकीट नसेल तर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडा, असे रेल्वे पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आले. सीएसएमटी स्थानकात दररोज प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, एसटी आंदोलकांच्या गर्दीमुळे याठिकाणी येण्याजाण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. आंदोलकांनी रेल्वे पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे आंदोलकांना अखेर सीएसएमटी स्थानक सोडावे लागले आहे. आता एसटी आंदोलक पर्यायी जागेच्या शोधात आहेत. सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेर एसटी आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे.
कोर्टाच्या निकालानंतरही सदावर्तेंनी आंदोलकांना भडकावलं, ते भाजपची भाषा बोलत होते: रोहित पवार
आम्ही कोणालाही त्रास देत नाही. आम्ही मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रात राहतो, असे सांगत आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलीस काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सध्या रेल्वे पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकाचा परिसर खाली करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे एसटी आंदोलक पुन्हा संतप्त झाले आहेत. आमच्या मदतीला कोणीही येत नाही. सिल्व्हर ओकवर कोणी काय केलं आम्हाला माहिती नाही. आम्ही आझाद मैदानावर शांतपणे आंदोलन करत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत इथून हटणार नाही, असा निर्धार एसी आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी आंदोलनक आता जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर ठिय्या देऊन बसले आहेत. आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेतल्याशिवाय आम्ही माघारी परतणार नाही, अशी भूमिका या एसटी आंदोलकांनी घेतली आहे. आझाद मैदानावर पहाटे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. तसेच काहीजणांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप एसटी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी किती चिघळणार, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here