जळगाव : भुसावळ शहरातील यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरात नियंत्रण सुटल्याने एका भरधाव आयशर थेट भरवस्तीत घुसल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. या अपघातात एका घरातील एक तरुण ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. सम्राट दादाराव इंगळे (२२, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचं नाव असुन त्याचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून काढले तर दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.

भरधाव आयशर ट्रक (एम.एच.४६ एएफ ५५५४) वरील मद्यधूंद चालकाने शनिवारी सकाळी जळगाव रोडवरील धम्म नगरात एकाला धडक दिली व त्यानंतर यावल रस्त्यावरून वाहन जात असताना साईजीवन सुपर शॉपसमोर एका खांबाला हे वाहन धडकले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरमधील वस्तीतील एका घराला जाऊन धडकल्याने सम्राट इंगळे हा तरुण जागीच ठार झाला तर भाऊ निलेश इंगळे जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला चोप दिला तर शहर पोलिसांनी वेळीच धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.

पवारांच्या घरावरील आंदोलनाची पोलिसांना आधीच माहिती होती; सदावर्तेंविरोधातील FIR मध्ये खुलासा
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक जगन सोनवणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, पप्पू सुरडकर, माजी नगरसेवक अमोल इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची बाजू ऐकून घेत त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. पदाधिकार्‍यांनी दाखवलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे वातावरण शांत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here