पुणे : मुंबई इंडियन्सविरुद्ध यावेळी आरसीबीने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीच्या संघात ग्लेन मॅक्सवेलने एंट्री केल्याचे स्पष्ट झाले, त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सच्या संघात यावेळी अष्टपैलू रमणदीप संधी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणार आहे.
गेल्या सामन्यात तर मुंबई इंडियन्सने एकाच षटकात आपल्या इतिहासातील सर्वाधिक ३५ धावा दिल्या होत्या. आता चौथा सामना गमावल्यावर त्यांच्यावर नामुष्कीची वेळ येणार आहे. कारण गुणतालिकेत सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद १०व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर मुंबईला पराबव पत्करावा लागला तर त्यांच्यावर १०व्या स्थानावर जाण्याची नामुष्की ओढवू शकते. कारण आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर चाहत्यांनी पाहिलेलाच नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात पराभव झाला तर त्यांना तोंड दाखवायचीही जागा राहणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आजचा सामना काही करून जिंकावा लागणार आहे. चौथ्या सामन्यात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे संघात प्रवेश करणार आहे. मॅक्सवेल हा आपल्या धमाकेदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच आरसीबीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात ठेवला आहे. यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस दमदार फलंदाजी करत होता, पण त्याला चांगली साथ मिळत नव्हती. पण आता मॅक्सवेल संघात आल्यामुळे आरसीबीची फलंदाजी अधिक बळकट झालेली आहे. त्यामुळे मुंबईच्या कमकुवत गोलंदाजीचा या सामन्यात निभाव लागणार नाही, असे चाहते म्हणत आहेत. गेल्या हंगामातही मॅक्सवेलने धडाकेबाज फटकेबाजी केली होती. यावेळी तर मॅक्सवेल लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात मॅक्सवेल कशी फलंदाजी करतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल. पहिल्या ३ लढती गमावलेल्या मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा असेल. पराभवाच्या हॅटट्रिकच्या धक्क्यातून बाहेर येऊन पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा प्रयत्न विजय मिळवण्याचा असेल. दोन्ही संघात आतापर्यंत २९ लढती झाल्या आहेत यापैकी १७ वेळा मुंबई तर १२ वेळा आरसीबीने बाजी मारली आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल, असे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here