मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या घटनेचे राज्याच्या राजकारणावर जोरदार पडसाद उमटत आहे. या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘शरद पवार यांना शारीरिक इजा करण्याचा हल्लेखोरांचा डाव होता,’ असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनामागे अज्ञात शक्तींचा हात असल्याचा दावा थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आणि त्यानंतर काही तासांतच एसटी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. सध्या सदावर्ते हे पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत गंभीर शंका उपस्थित केली आहे.

शिवसेना भवन म्हणजे मशिद आहे का?; भोंग्यांवरील कारवाईनंतर मनसेचा तिखट सवाल

‘शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. हल्लेखोरांनी त्यांच्या घराची आधीच रेकी केली होती आणि शरद पवारांना शारीरिक इजा करायची होती, मात्र महाराष्ट्राच्या नशिबाने असं काही घडलं नाही,’ असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या घरासमोर घडलेला प्रकार हे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे, तर राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांकडूनच असे हल्ले करण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्याचं म्हणणं आहे. या प्रकरणावरून आगामी काळातही राजकारण तापण्याची शक्यता असून आव्हाड यांच्यासारख्या कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या या गंभीर आरोपाप्रकरणी पोलिसांकडून आगामी काळात काय कारवाई करण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here