मुंबई: महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्णांची संख्या ११३५ वर पोहचली असून आतापर्यंत ११७ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री यांनी दिली. महाराष्ट्र अजून करोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. त्यामुळे येत्या काळात आपण अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे, असेही टोपेंनी सांगितले.

करोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल सुरू करण्यात येत असून मोठ्या शहरांत मोबाइल क्लिनिक उपलब्ध केले जाणार आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

करोनाबाधीत रुग्णांवरील उपचारांत सुसूत्रता यावी यासाठी त्यांच्यातील लक्षणांनुसार विभागणी करण्यात येत आहे. करोनाची तीव्र लक्षणे असणारे रुग्ण तसेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येणार आहेत. मुंबईत करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर मुंबई इस्पितळ, लीलावती, पोद्दार, साई हॉस्पिटल (धारावी), आणि सुश्रुता रुग्णालयात उपचार होतील तर तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर सेव्हन हिल्स, नानावटी, कस्तुरबा, सैफी या रुग्णालयांत उपचार होतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

दाट लोकवस्तीच्या भागांत आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच धारावीत लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. शिवाय मुंबईत करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्क बंधनकारक करण्यात आले आहे, असेही टोपेंनी सांगितले.

देशाच्या तुलनेत राज्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आधीच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीस करोना झाल्यास अशा रुग्णाची प्रकृती वेगाने ढासळते. राज्यात अशाच रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here