मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर बाजी मारली. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी १५ धावा करायच्या होत्या. पण राजस्थानचा युवा गोलंदाज कुलदीप सेनने भेदक मारा केला आणि संघाला तीन धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. राजस्थानच्या १६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरला आणि त्यांना पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. यामुळे लखनौची अवस्था ही २ बाद १ धाव अशी झाली होती. पण त्यानंतर क्विंटन डीकॉकने ३९ धावांची खेळी साकारत लखनौच्या डावाला साववरण्याचा प्रयत्न केला, पण तो मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यानंतर लखनौचा संघ सावरू शकला नाही.
लखनौच्या संघाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण लखनौच्या संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलची विकेट काढली आणि लखनौला बॅकफूटवर ढकलले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात लखनौला दोन मोठे धक्के दिले. पहिल्या चेंडूवर बोल्टने लोकेश राहुलला बाद केले, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने कृष्णप्पा गौतमला माघारी धाडले. या दोघांनाही भोफळा फोडता आला नाही आणि संघाची २ बाद १ अशी बिकट अवस्था झाली. त्यानंतर जेसन होल्टरच्या रुपात लखनौच्या संघाला तिसरा धक्का बसला. होल्डरने यावेळी आठ धावा केल्या.
तत्पूर्वी, राजस्थानलाही यावेळी चांगली सलामी मिळू शकली नाही. जोस बटलरच्या रुपात राजस्थानच्या संघाला यावेळी पहिला धक्का बसला. बटलरला यावेळी १३ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर एकामागून एक राजस्थानचे फलंदाज आऊट होत गेले. संजू सॅमसन यावेळी १३ धावांतर तर देवदत्त पडीक्कल २९ धावांवर बाद झाला, त्यानंतर फलंदाजीला आलेला रॅसी व्हॅन डर दुसेन आऊट झाला आणि राजस्थानच्या संघाला तिसरा चौथा बसला. रॅसीने यावेळी फक्त चार धावा केल्या. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि आर. अश्विन यांनी राजस्थानचा डाव सावरला. हेटमायरला यावेळी चांगली साथ मिळाली ती आर. अश्विनची. या सामन्यात अश्विनने २८ धावा केल्या, पण तो जखमी निवृत्त होऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रायन परागने एका षटकारासह चार चेंडूंत आठ धावा केल्या. पण हेटमायरने मात्र यावेळी लखनौच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. हेटमायरने यावेळी २६ चेंडूंत एक चौकार आणी सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावांची महत्वाची खेळी साकारली. हेटमायरच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावरच राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा उभारता आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here