मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने, तसेच पुनर्विकासात विकासकाकडून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याच्या तक्रारी वाढत असल्याची गंभीर दखल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली आहे. पैसे घेऊन घर न दिले जात नसल्याच्या, पुनर्विकासात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असून मालमत्ता गुन्हे चिंतेचे ठरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून त्यांचे गृहस्वप्न मोडणाऱ्या विकासक तसेच इतर व्यक्तींवर आता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

पांडे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर भाष्य केले. मोबाइल क्रमांक जाहीर केल्यामुळे मुंबईतून अनेकजण तक्रारींचे संदेश पाठवत असतात. यात मालमत्ता खरेदीमध्ये होणाऱ्या फसवणुकीची समस्या अधिक त्रासदायक ठरत असल्याचे मुंबईकरांच्या तक्रारीतून जाणवत असल्याचे पांडे म्हणाले. ‘पुनर्विकास रखडणे, रहिवाशांची राहण्याची व्यवस्था न करणे, त्यांना भाडे नाकारणे, बुकिंगच्या नावाखाली पैसे घेऊन घर न देणे असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे’, असे सांगतानाच आमच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरी नागरिकांना अशा प्रकारे फसविणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहोत, असा इशारा पोलिस आयुक्तांनी यावेळी दिला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केल्या जात असलेल्या प्रभावी कारवाईमुळे कोंडीच्या स्थितीमध्ये फरक जाणत आहे. मात्र, नियम मोडणाऱ्यांना अद्याप समज आली नसल्याचे आयुक्त म्हणाले. हेल्मेटविना दुचाकी चालविणे, वाहनाच्या भरधाव वेगात शर्यती लावणे हे प्रकार सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. हुक्का पार्लरच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. न्यायालयाचा आदेश दाखवून हर्बल हुक्क्यासाठी परवानगी मागितली जाते. परंतु आम्ही हर्बल आणि तंबाखूजन्य गुटखा हे कसे ओळखणार, असा प्रतिसवाल त्यांनी हुक्का पार्लर चालकांना केला.

हॉर्न वाजवणाऱ्यांची परीक्षा
वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असून हेल्मेट न घालणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना समज दिल्यानंतर आता विनाकारण हॉर्न वाजवून प्रदूषण करणाऱ्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे. दंडात्मक कारवाई केली जाईलच, पण त्याचबरोबर कार्यलयात नेऊन वाहतुकीच्या नियमांचे धडे शिकवले जातील आणि त्यावर परीक्षाही घेतली जाईल, असे पांडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here