जेएनयूत पुन्हा हिंसाचार; मांसाहार केल्यावरून ABVP कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप – clash in jnu on ram navami; abvp vs left 15 students injured latest updates
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात रविवारी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. तर दुसरीकडे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचा दावा केला आहे. (Jnu Abvp Jnusu Clash)
पोलीस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) मनोज सी. यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. जेएनयूमध्ये झालेल्या राड्यात १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती असून या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपशील लवकरच दिला जाईल, असंही मनोज सी. यांनी म्हटलं आहे. भाजपचे हिंदुत्व बेगडी, उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात बोचरी टीका
दोन्ही गटांकडून आंदोलन
वसतीगृहात झालेल्या हिंसाचारानंतर अभाविप आणि जेएनयूएसयूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध आंदोलन करत घोषणाबाजी केली. यामुळे वसतीगृह परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
केंद्रात २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून जेएनयू सातत्याने चर्चेत आहे. याआधीही या विद्यापीठात अभाविप आणि डाव्या संघटनांमध्ये अनेकदा वाद झाला आहे. या सगळ्या गदारोळानंतरही देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत जेएनयू २०१६ साली तिसऱ्या क्रमांकावर होते, तर २०१७ साली दुसऱ्या स्थानावर होते.