मुंबई: आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना वाचवण्यासाठी भाजपकडून बनावट पुरावे तयार करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. माझ्या माहितीप्रमाणे कालपासून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची माणसं राजभवनावर जाऊन मागच्या तारखेची काही कागदपत्रं तयार करत आहेत. राजभवनाने या देशविरोधी कृत्यामध्ये सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची उरलीसुरली अब्रूही जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण घोटाळ्यावर आणि किरीट सोमय्याच्या फरार होण्यावर अजूनही वक्तव्य केलेले नाही. विक्रांत घोटाळ्याला भाजपचे अधिकृत समर्थन आहे का, हा माझा प्रश्न आहे. किरीट सोमय्या देशाबाहेर पळून जाणार असल्याची माझ्याकडे पक्की माहिती आहे. भाजपने त्यांना महाराष्ट्राबाहेर लपवून ठेवले आहे. मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे. त्यामुळे किरीट सोमय्याही अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत त्यांच्याप्रमाणे देशाबाहेर पळून जाऊ शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.
INS Vikrant fund: किरीट सोमय्या,नील सोमय्या देशाबाहेर पळून जायच्या तयारीत; संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत आणखी काय म्हणाले?

माझ्या माहितीप्रमाणे ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा गैरवापर झाला.योग्य ठिकाणी ते पैसे जमा केले नाही. म्हणजेच राजभवनात दहा-बारा वर्षे झाले, पैशाचा हिशोब दिला नाही. हा आर्थिक गुन्हा आहे. आता हा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून महाराष्ट्रभर पैसे जमा केले आहेत. देशातून आणि देशाबाहेरूनही पैसे गोळा केले आहेत. तपास त्या पद्धतीने सुरू व्हायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here