अमरावती : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा भीषण रेल्वे अपघात झाला आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून रेल्वे रुळावर उतरलेले प्रवासी कोणार्क एक्स्प्रेसखाली चिरडले गेल्याने हा अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Railway Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस गाडी बुटवा गावाजवळ थांबली होती. त्यामुळे या गाडीतील काही प्रवासी रेल्वे रुळावर उतरले, मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सहा प्रवाशांनी जागीच आपले प्राण गमावले. घटनेची माहिती मिळताच श्रीकाकुलमच्या पोलीस अधीक्षक जी. आर. राधिका या घटनास्थळी दाखल झाल्या. ‘आतापर्यंत सहा प्रवाशांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. या दुर्घटनेत आणखी काही लोक जखमी झाले आहेत का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे,’ अशी माहिती राधिका यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी देणार आश्चर्याचा धक्का; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘प्रवासी अचानक रेल्वे रुळावर उतरल्याने ही दुर्घटना झाली असून पोलीस आणि रेल्वेच्या टीमकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे,’ असंही पोलीस अधीक्षक जी. आर. राधिका यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

राज्यात झालेल्या रेल्वे अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच रेड्डी यांनी प्रशासनाला बचावकार्याच्या सूचना दिल्या असून जखमींच्या उपचाराबाबत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, असेही आदेश जगन मोहन रेड्डी यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here