खेड येथील कोरोनाबाधीत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोनाचा हा पहिला बळी आहे. संबंधित व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती. खेड रुग्णालयात या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. तिथेच आज त्याचा मृत्यू झाला.
खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ६ एप्रिल रोजी या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची प्रकृती खालावत गेली आणि आज मृत्यू झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा हा पहिला बळी असून या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे.
४ डॉक्टरांसह ५२ जण क्वारंटाइन
रत्नागिरी जिल्ह्यात राजीवडा व साखरतर येथे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यात ४ डॉक्टरांचा समावेश आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयातील रुग्णांना बुधवारी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. साखरतर येथील या महिलेला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला होता. त्यामुळे ती परिसरातील एका महिला डॉक्टरकडे उपचाराकरीता गेली होती. आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयातील डॉक्टर्ससह बसणी येथील तसेच जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला क्वारंटाइन केले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
उदय सामंत यांनी घेतला आढावा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीवडा आणि साखरतर येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थ, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढविले. प्रशासनाने या दोन्ही भागांना संलग्न असलेला तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे. या परिसरात जंतूनाशक फवारणी करून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करुन आवश्यक त्या सूचना देत आहेत तर पोलीस यंत्रणा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन आज सामंत यांनी पाहणीदरम्यान केले.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines