मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘आएनएस विक्रांत’बाबत केलेल्या आरोपानंतर माजी सैनिकाच्या तक्रारीवरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या हे अज्ञातवासात गेले असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी आपली बाजू मांडत राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. (Kirit Somaiya News Update)

‘डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ‘विक्रांत’ युद्धनौका ६० कोटी रुपयांना भंगारावाल्याला विकण्यासाठी काढली होती. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करत प्रतिकात्मकरित्या निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता आणि यामध्ये ११ हजार रुपये जमा झाले होते. मात्र आता १० वर्षांनंतर शिवसेना नेते संजय राऊत आरोप करत आहेत की आम्ही ५८ कोटी रुपये चोरून मुलाच्या कंपनीच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केलं. याआधीही मागच्या दोन महिन्यांमध्ये संजय राऊत यांनी माझ्यावर सात वेगवेगळे आरोप केले आहेत, परंतु यातील एकाही आरोपाचा पुरावा पोलिसांकडे नाही,’ असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

‘आम्ही उच्च न्यायालयात सर्व माहिती देणार’

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. ‘ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर शेवटची कारवाई होईपर्यंत मी झुकणार नाही आणि मागे हटणार नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्व माहिती आम्ही उच्च न्यायलयात देणार आहोत,’ असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

Raj Thackeray:’वारं खूप सुटलंय आणि सुटलंय ते आपलंच आहे’; मनसेच्या #उत्तरसभेचा ट्रेलर पाहिलात का?

दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणात मुंबई पोलीस किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा शोध घेत असून ते दोघेही अद्याप हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत याप्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here