साठेनगरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही तरुणांनी दुचाकीवरून मिरवणूक काढली होती. या परिसरातून हॉर्न वाजवत जोरजोरात घोषणा देत जात असताना येथील काही तरुणांनी त्यांना रोखले आणि शांततेत जाण्यास सांगितले. यावरून दोन्ही गटांत वाद झाला. या मिरवणुकीवर आक्षेप घेणाऱ्या तरुणांनी दुचाकींवरील काही तरुणांना मारहाण केली. दुचाकींवरील तरुण काही वेळाने लाठ्याकाठ्या आणि तलवारी घेऊन पुन्हा याच परिसरात आले. त्यांना पाहून मारहाण करणाऱ्या तरुणांनी पळ काढला.
त्यानंतर, कुणीच दिसत नसल्याचं पाहून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार, रिक्षा तसेच इतर वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला. तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही गटांतील तरुणांवर गुन्हा दाखल करून यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.