मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘केंद्र सरकारची ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असणारे किरीट सोमय्या कुठे आहेत, अशी विचारणा आम्ही केंद्राकडे नक्कीच करू,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्यांनी जोरदार टीकाही केली आहे. ‘दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वत:वर आरोप झाले की चौकशीला सामोरं जायचं नाही, हे काही शूरपणाचं लक्षण नाही,’ असा टोला वळसे पाटील यांनी लगावला आहे.

मोठी बातमी : ‘गायब’ असणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ

सदावर्तेंविषयी काय म्हणाले गृहमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत. याबाबतही गृहमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रीतसर चौकशी सुरू आहे, जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती पोलीस न्यायालयात देत आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने जास्त माहिती उघड करणं योग्य नाही. मात्र गुप्तचर यंत्रणेनं पत्र लिहून हल्ल्याची कल्पना दिली असतानाही योग्य ती काळजी घेतली नाही, त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईनंतर आता राज्याचं गृहमंत्र्यालयही आक्रमक झाल्याचं गृहमंत्री वळसे पाटलांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळातही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here