मुंबई : भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांना मुंबै बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी न्यायालयाचे आभार मानत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त हे काही लोकांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध कट रचत होते. या सगळ्यांचे सीडीआर तपासले तर नेमकं कसं कारस्थान रचलं हे लक्षात येईल,’ असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसंच कारवाई करून हे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे जेवढा अन्याय करतील तेवढ्या जास्त ताकदीने मी या सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणार आहे,’ असंही दरेकर म्हणाले.

‘महाविकास आघाडीने सुरू केलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या छळाला आज कोर्टाच्या निर्णयाने चोख उत्तर मिळालं आहे. ज्या प्रकरणात काहीच तथ्य नव्हतं त्यामध्ये जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्याचं कुभाड महाविकास आघाडीकडून रचण्यात आलं होतं. स्वत: पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याचं मला दिसत होतं. मात्र आपल्या देशात न्यायव्यवस्था खूप मजबूत आहे आणि आज न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार चपराक दिली आहे,’ अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.

मुलांना जातीपातीचं राजकारण शिकवू नका; प्रकाश आंबेडकरांवर मनसे नेत्याचा प्रहार

‘मी पहिल्या दिवसापासून पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीला सहकार्य करत होतो. कारण मला माहीत आहे की या प्रकरणात काहीही तथ्य नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास होता आणि याच न्यायदेवतेने मला दिलासा दिला आहे,’ असंही प्रवीण दरकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाने प्रवीण दरेकर यांना अटकेपासून संरक्षण मिळालं असलं तरीही गुन्हा दाखल असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here