नगर जिल्ह्यातून जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू या भागात लिंबांना मागणी असते. यावर्षीही ती वाढली आहे. मात्र, मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने मार्चपासूनच भाववाढीला सुरवात झाली. फेब्रुवारीच्या अखेरीस २५ ते ३० रुपये किलो असलेला भाव आता वाढत शंभरी ओलांडून गेला आहे.
मुळात उत्पादन कमी आहे. लिंबाचे दररोज लिलाव होत असले तरी आवक कमी होत आहे. खराब हवामानामुळे मधल्या काळात बहर आणि फळांची झड झाली. त्यामुळे उत्पादन घटले. त्यातुलनेत खर्च मात्र होत राहिला. त्यामुळे आता भाव वाढले असले तरी तेवढे उत्पादन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तुलनेत कमीच पैसे पडणार आहेत. ज्यांच्याकडे जास्त उत्पादन आहे, अशा मोजक्याच शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो, इतरांना याचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.
श्रीगोंद्यातील लिंबू चांगल्या प्रतिचे असल्याने येथे खरेदीसाठी मोठ्या संख्येने व्यापारी येतात. त्यामुळे खरेदीसाठी स्पर्धा लागते. त्याचा फायदा होतो, हे नक्की. मागणी वाढल्याने भावही वाढले आहेत. मात्र, उत्पादन मर्यादितच आहे, अशी महिती लिंबू उत्पादक संघाचे अध्यक्ष गोरख आळेकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या म्हणणे आहे की, यावेळी भाव चांगला मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झाली आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे. हे उत्पादन घेण्यासाठी खर्च मात्र तेवढाच होत आहे. उलट महागाईमुळे तो वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होईल, केवळ गैरसमज आहे.