मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी मंगळवारी अचानक भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरावर जाऊन धडकले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या कारवाईचे टायमिंग देखील तितकाच चर्चेचा विषय ठरत आहे.

कारण EOW चे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी धडकण्यापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. सुरुवातीला ही बैठक नियमित कामकाजासंदर्भात असावी, असा होरा वर्तविला जात होता. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच किरीट सोमय्या यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जाऊन धडकले. आता या बैठकीचा आणि EOW च्या कारवाईचा काहीही संबंध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा सगळा योगायोग आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

यापूर्वीही गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील कारवाईपूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात भेटीगाठींना वेग आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्य सरकारकडून भाजपच्या नेत्यावर मोठी कारवाई झाली आहे. कोणताही मोठा निर्णय किंवा कारवाई होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सल्लामसलत होत असल्याचा पॅटर्न यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला आहे.
किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमची धडक; अटकेची टांगती तलवार
संजय राऊतांनी दिलेल्या पुराव्यांवर अखेर कारवाईला सुरुवात?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि ईडी अधिकाऱ्यांच्या कनेक्शनसंदर्भात अनेक खुलासे केले होते. किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून ईडी मुंबईतील उद्योजक आणि बांधकाम व्यवसायिकांना धमकावून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले होते. हे सर्व पुरावे संजय राऊत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सुपूर्द केले होते. तसेच आयएनएस विक्रांत प्रकरणातही संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर ५७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

मात्र, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पिता-पुत्रांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे आता EOW याचा पुराव्यांच्या आधारे कारावाईला सुरुवात केली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. EOW ने किरीट सोमय्या यांना १३ एप्रिलला म्हणजे उद्या कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. आता सोमय्या यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here