किरीट सोमय्या यांच्यानंतर मुलगा नील सोमय्यांचाही पाय खोलात; कोर्टात धक्का – kirit somaiya’s son neil somaiya’s anticipatory bail plea rejected by court
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या (Kirit Somaiya Son Neil Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. युद्धनौका ‘विक्रांत’साठी जमा करण्यात आलेल्या पैशांमध्ये अपहार केल्याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर आज नील सोमय्यांनाही अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोमय्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आएनएस विक्रांत प्रकरणात किरीट आणि नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर एका माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर सोमय्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस दोघांनाही अटक करण्याची शक्यता होती. त्यातच आता किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ मुलगा नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची भेट; तासाभरातच आर्थिक गुन्हे शाखा सोमय्यांच्या घरी धडकली
काय आहे आरोप?
किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत भंगारात जाऊ नये म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून ५८ कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग केलं, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांविरोधात माजी सैनिकांनी दाखल केली तक्रार
आर्थिक गुन्हे शाखेची सोमय्यांच्याघरी धडक
‘विक्रांत’ प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झाले. मात्र किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे दोघेही घरी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या दोघांनी चौकशीसाठी उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावं, अशी नोटीस अधिकाऱ्यांकडून त्यांची घरी आणि कार्यालयात देण्यात आली आहे.