नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव येथे करोना सदृष्य लक्षणे असलेल्या पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला असून पाचही जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, एका करोना सदृष्य रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला होता. त्याचा करोना तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
करोनाबाधीत पाचही रुग्ण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. यापैकी कोणीही परदेशात जाऊन आले नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मालेगावातील १८ पैकी ६ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून १२ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. जिल्ह्यातील करोनाबाधीत रुग्णाची संख्या आता सहा झाली असून एक रुग्ण दगावला आहे.
दरम्यान, सोमवारी करोना चाचणीत पॉझिटिव्ह निघालेल्या नाशिक शहरातील मनोहर नगर येथील रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची स्वॅब टेस्ट पूर्ण करण्यात आलेली आहे. पाच पैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अजून प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times