नवी मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला जेव्हा चार पराभव पत्करावे लागले होते, तेव्हा काही जणांनी त्यांची खिल्ली उडवली होती. पण पाचव्या सामन्यात दमदार कामगिरी करत आमचा नाद करायला नाही, हे चेन्नईने आपल्या टीकाकारांना दाखवून दिले. रॉबिन उथप्पाच्या ८८ आणि शिवम दुबेच्या नाबाद ९५ धावांच्या जोरावर चेन्नईने आरसीबीपुढे २१७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस हे मोहरे झटपट गमावले. त्यामुळेच चेन्नईच्या संघाने या सामन्यात आरसीबीवर २३ धावांनी दमदार विजय साकारला.
चेन्नईच्या २१७ धावांचा पाठलाग करताना फॅफच्या रुपात आरसीबीच्या संघाला पहिला धक्का बसला. फॅफला यावेळी आठ धावा करता आल्या. त्यानंतर विराट कोहली पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहलीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. आरसीबीचा सलामीवीर अनुज रावत यवेळी आठ धावांवर आऊट झाला आणि आरसीबीच्या संघाला तिसरा धक्का बसला. तीन विकेट्स गेल्यावर ग्लेन मॅक्सवेल हा दमदार फटकेबाजी करत होता. पण जडेजाने यावेळी मॅक्सवेलला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. मॅक्सवेलला यावेळी ११ चेंडूंत २६ धावा करता आल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकच्या रुपात एकमेव आशा आरसीबीकडे होती. पण तो ३४ धावांवर आऊट झाला आणि आरसीबी हा सामना जिंकणार नाही हे स्पष्ट झाले.
तत्पूर्वी, रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी आरसीबीच्या गोलंदाजीचे वस्त्रहरण केले आणि त्यांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. उथप्पा आणि शिवम या दोघांनीही चौकारानिशी आपली अर्धशतकं पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांना आरसीबीच्या गोलंदाजीची धुलाई केली. उथप्पा आणि शिवम यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला प्रथण फलंदाजी करताना आरसीबीपुढे २१६ धावांचे आव्हान ठेवता आले. उथप्पाने यावेळी ५० चेंडूंत ८८ धावांची तुफानी खेळी साकारली, यामध्ये चार चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेने यावेळी पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर ४५ चेंडूंत नाबाद ९५ धावांची तुफानी खेळी साकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here