धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका नव्हे तर फक्त भोवळ; अजित पवारांनी दिली माहिती – ajit pawar gave information about ncp dhananjay munde’s health breach candy hospital latest updates
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde News Today) यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘धनंजय मुंडे यांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. एमआयआरसह इतर तपासण्या करण्यात येत आहेत. मुंडे हे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पक्ष कार्यालयात होते. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कुटुंब त्यांच्यासोबत असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने ‘ईडी’च्या कारवाईपासून अभय दिल्यामुळेच राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय; संजय राऊतांचा पलटवार
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतचे वृत्त पसरल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच काही कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. डॉक्टरांनी सध्या मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुंबईत न येता जिथे आहेत तिथूनच त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी धनंजय यांना भेटल्यानंतर सांगितलं की, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.