मुंबई: केंद्र सरकारने ‘ईडी‘च्या कारवाईपासून अभय दिल्यामुळेच राज ठाकरे यांचा भोंगा वाजत आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही. त्यामुळे आता ‘असे’ भोंगे लावून माहौल तयार केला जात आहे. ईडीच्या (ED) कारवाईपासून अभय मिळाल्यामुळेच हा भोंगा वाजत आहे. आम्ही ईडीच्या कारवाईला सामोरे जातोय, त्यांच्याशी लढतोय. त्यामुळे आम्हाला चिंतेचे कारण वाटत नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut hits back at Raj Thackeray)
अजित पवारांची टीका राज ठाकरेंच्या जिव्हारी, नक्कल करत म्हणाले, ‘लाव रे व्हिडीओ’
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उत्तरसभेतील भाषणाचा समाचार घेतला. आमच्या नकला केल्यात, खोट बोललात तरी शिवसेना आणि महाविकास आघाडी भक्कम आहे. एका वैफल्यातून आणि निराशेतून हे भोंगे वाजू लागले आहेत. भाजपचे भोंगे लावून उपयोग झाला नाही. त्यामुळे आता हे भोंगे लावण्यात आले आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटमसंदर्भातही संजय राऊत यांनी भाष्य केले. राज्य सरकारला अल्टिमेटम कोणीही देऊ शकत नाही. अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या देशातील अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ यात्रा किंवा वैष्णोदेवी यात्रेवरून अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत या देशात फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती. आजचा जो अल्टिमेटम आहे, हा जो भोंगा वाजतोय, हा भाजपचाच भोंगा आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मी राज्य सरकार आणि गृहखात्याला सांगतो की, आम्हाला राज्यात कुठलीही तेढ निर्माण करायची नाही. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं नाही. ३ तारखेला ईद आहे. आज १२ एप्रिल आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने १२ मे ते ३ मे या काळात राज्यभरातील सर्व मौलवींशी चर्चा करावी. त्यानंतर मशिदींवरील भोंगे खाली आले पाहिजेत. त्यानंतर मनसेकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here