ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Raj Thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव न घेता कायम फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेतात, असं म्हटलं होतं. या आरोपाला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्रमक शैलीत उत्तर दिलं. ‘महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली होती. शाहू महाराज हे तर शिवाजी महाराजांचे वंशजच होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोघांना डोळ्यासमोर ठेवून देशाचं संविधान लिहिलं. या तीन महापुरुषांच्या ओठात आणि कृतीत शिवाजी महाराज होते. त्यामुळे या तिघांचं नाव घेणं म्हणजेच शिवाजी महाराजांच्या विचारांचं नाव घेण्यासारखं आहे,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांना देशात पेट्रोल आणि डिझेलची होत असलेली भाववाढ दिसत नाही का? की फक्त तरुणांना उजव्या विचारसरणीकडे घेऊन जाण्यासाठी तुम्ही काहीही बोलणार? असा सवाल करत आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

Jitendra Awhad: राज ठाकरेंमध्ये वर्णद्वेष आणि जातीयवाद ठासून भरल्यामुळेच ते इतरांना रंगरुपावरून हिणवतात: जितेंद्र आव्हाड

जेम्स लेन प्रकरणावरून पुन्हा हल्लाबोल

राष्ट्रवादीने जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण केल्याचा आरोप वारंवार राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येतो. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘जेम्स लेनने जे काही लिहिलं त्याला महाराष्ट्रातून माहिती कोणी पुरवली होती? दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मी काही बोलणार नाही. कारण निधन झालेल्या व्यक्तीवर टीका करायची नसते, असा आपला धर्म सांगतो,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तके वाचावीत, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here