मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य करून आपलं मत व्यक्त करते तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. महागाई, बेरोजगारी अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलं नाही,’ असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे. (Sharad Pawar Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांना तीन गंभीर प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना उत्तरे देत शरद पवार यांनी राज यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Jitendra Awhad: राज ठाकरेंमध्ये वर्णद्वेष आणि जातीयवाद ठासून भरल्यामुळेच ते इतरांना रंगरुपावरून हिणवतात: जितेंद्र आव्हाड

शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत?

शरद पवार हे आपल्या भाषणांमध्ये नेहमी फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेतात, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘दोनच दिवसांपूर्वी मी यवतमाळ इथं केलेल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या योगदानावर २५ मिनिटे बोललो आहे. मी दररोज सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचतो. मात्र त्यासाठी मला सकाळी लवकर उठावं लागतं. काहीजण सकाळी वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य करत असतील तर त्याविषयी मी काय बोलणार? पण शाहू-फुले-आंबेडकर यांचं नाव मी भाषणांमध्ये घेतो याचा मला अभिमान आहे. कारण या तीनही महापुरुषांनी शिवछत्रपतींचे विचार पुढे नेण्याचं काम केलं आहे.’

ठाण्यातील सभेत तलवार दाखवणं भोवले; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन

‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मी विरोध केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. होय, माझा पुरंदरे यांच्या विचारांना विरोध होता. कारण शिवरायांना घडवण्यामध्ये जिजामातांपेक्षा दादोजी कोंडदेव यांचं योगदान होतं, अशी मांडणी त्यांनी केली होती. मात्र मला ही मांडणी मान्य नाही. कारण शिवाजी महाराजांनी जे काही कर्तृत्व केलं, त्यांना घडवण्यात जिजामातांचं मोठं योगदान होतं. दुसरीकडे जेम्स लेन याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लेखन केलं आणि या लिखानात मला बाबासाहेब पुरंदरेंची मदत झाल्याचं त्याने स्वत:च सांगितलं होतं. पुरंदरे यांनीही कधी याबाबत खुलासा केला नाही. त्यामुळे माझे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत मतभेद होते आणि मला त्याचं आजही दु:ख नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सोनिया गांधी यांना विरोध आणि पुन्हा काँग्रसोबत आघाडी

शरद पवार यांनी १९९९ साली परदेशी व्यक्ती पंतप्रधान व्हायला नको, असं सांगत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना विरोध केला आणि काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र काही महिन्यांतच शरद पवार यांच्या पक्षाने पुन्हा काँग्रेससोबत आघाडी केली, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्यावर भूमिका बदलल्यााचा आरोप करू नये, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज यांच्या या आरोपालाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘परदेशी व्यक्ती भारताचा पंतप्रधान होण्यास माझा विरोध होता. मात्र नंतरच्या काळात सोनिया गांधी यांनीच आपल्याला पंतप्रधानपद स्वीकारण्यात रस नसल्याचं सांगितलं. त्यामुळे वादाचा मुद्दाच संपून केला आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांनी आपण एकत्रितपणे काम करायला हवं असं सांगितल्याने आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here