मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’ निधी अपहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकेच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. तसंच अटक झाल्यास ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सोडण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी २८ एप्रिलला ठेवण्यात आली आहे. (Kirit Somaiya News Today)

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्या यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र सोमवार, १८ एप्रिलपासून सलग चार दिवस सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमय्या यांना दिले आहेत.

नास्तिकपणाच्या आरोपाला पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘मी माझ्या देवधर्माचं प्रदर्शन करत नाही’

किरीट सोमय्या यांना का मिळालं अटकेपासून संरक्षण?

किरीट सोमय्या यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ‘या प्रकरणात २०१३ ते २०२२ या कालावधीत कोणाचीही तक्रार नव्हती. शिवाय आता दाखल केलेली तक्रारही अस्पष्ट स्वरूपाची असून ती प्रसारमध्यमांतील वृत्तांच्या आधारे आहे आणि त्याआधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे,’ असं न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘विक्रांत’ युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून ५८ कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केलं, असा आरोप शिवसेन नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर एका माजी सैनिकाने तक्रार दाखल केल्याने ट्रॉम्बे पोलीस स्थानकात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here