सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात डॉल्बी लावण्यास परवानगी द्या, अशी मागणी करत बुधवारी सोलापूरात आंबेडकर प्रेमींनी रास्ता रोको आणि धरणे आंदोलन केले. त्यामुळे ऐन आंबेडकर जयंतीच्या तोंडावर सोलापूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुढे करत सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयलाच्या आदेशानुसार डॉल्बी लावण्यावर मर्यादा आणल्या आहेत.
आपण सर्व घटना मानतो, सर्व नियम बाबासाहेबांनी बनवलेले आहेत, जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालये बाबासाहेबांच्या घटनेने निर्माण केली आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मग आपण सर्वांनी काय करायला हवे? घटनेने दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन झाले पाहिजे. कायद्याने बंदी असलेल्या डॉल्बीला परवानगी देता येणार नाही, असं पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी सांगितलं आहे.