गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; आर्थर रोड तुरुंगातून सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात – satara police detained adv gunratna sadavarte from mumbai police in controversial statement case
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्याअॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दुसरीकडे सातारा पोलीसही गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी ११ एप्रिलला मुंबईत पोहोचले होते. सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे.
मुंबईतील आर्थर रोड कारागृह परिसरातून गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. सातारा पोलीस गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात पोहोचणार आहेत. साताऱ्यात पोहोचण्यास उशीर झाल्यास सदावर्ते यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सदावर्ते यांच्यावर दीड वर्षांपूर्वी फलटणमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मशिदीच्या भोंग्यांवरून राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम; राऊतांनी तिरकस शैलीत दिलं उत्तर
सातारा पोलीस गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन मुंबईतून साताऱ्याकडे निघाले आहेत. मुंबई पोलिसांचं अतरिक्त पथक मुंबईच्या सीमेपर्यंत सातारा पोलिसांच्या पथकासोबत असणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सदावर्ते यांनी ते वक्तव्य केलं होतं. सदावर्ते यांच्याविरोधात त्यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातारा पोलिसांचा गिरगाव न्यायालयाकडे अर्ज
उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांकडून अटक होताच त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पावलं उचलली होती. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्याचे निर्देश ऑर्थर रोड जेल प्रशासनाला दिले आणि आज सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.