अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका केमिकल फॅक्टरीला (Chemical Factory) भीषण आग (Fire) लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. आगीत होरपळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी असल्याची माहिती आहे. ऐलुरु जिल्ह्यातील अक्किरेड्डी गुडेममधील पोरस केमिकल फॅक्टरीत गॅस गळती झाल्यानं रिअ‌ॅक्टरचा स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. तसंच १३ जण जखमी असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.

दुर्घटनेतील जखमींना विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये ६ जण बिहारचे असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली आहे. केमिकल कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. प्रशासनानं सुरुवातीला जखमींना नुझविड या गावातील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विजयवाडा येथे नेण्यात आलं आहे.

‘रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसेबाबत मौन बाळगून PM मोदींनी आरोपींना दिलं संरक्षण’

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. आगीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना २५ लाख आणि गंभीर जखमींच्या उपचारासाठी ५ लाख, तर किरकोळ जखमी असलेल्या व्यक्तींना २ लाख रुपये देण्याची घोषणा जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचारासाठी मदत करण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी सहकार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी देखील ऐलरु दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here