गुढीपाडव्याच्या सभेनंतर शेख यांनी आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला कसे सामोरे जायचे, १६ वर्षाचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळयात पाणी आले, अशी भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारू लागला आहे की, मनसेची नेमकी भूमिका काय आहे, पक्षात नेमके काय चालले आहे याकडेही शेख यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान ठाण्याच्या सभेतही राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करीत भोंगे काढण्यासाठी ३ मे ची डेडलाईन दिल्याने नाराज झालेल्या शेख यांनी गुरूवारी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवला.
इरफान शेख यांचं भावनिक पत्रं
मी पक्षस्थापनेपासून आपल्या सोबत कार्य करीत आहे.पक्षाच्या अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक केसेस अंगावर घेतल्या.२००८ च्या मराठी पाट्यांचा आंदोलनात मला पोलिसांनी अटक करून संपूर्णअंग हिरवे निळे करेपर्यंत मारहाण केली. त्यावेळी आपणच मला म्हणाला होता की या जखमा विसरू नको,बाकी मी बघतो साहेब आता बघायला हे दिवस मिळाले एका बाजूने समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण. माझ्या सारख्या आर्थिक परिस्थिती नसलेल्या कार्यकर्त्यांने आता कुठे आणि कोणाकडे भावना सांगाव्या? माझा राजीनामा मी खूप जड अंतकरणाने आपल्याला सोपवत आहे.
साहेब आज माझ्या कुटुंब आणि समाज यापुढे मी हतबल आहे.ज्या कुटुंबातील व्यक्तींनी मला आपल्या सोबत काम करण्याची प्रेरणा दिली तेच आज तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहे. १६ वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना तुम्ही आम्हाला का नाही या गोष्टी बोललात आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता.साहेब आपण आपल्या बाजूने चुकला नसाल ही, पण आमच्या बाजूने अवश्य काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे. तरी आपण मी दिलेला राजीनामा स्वीकारावा. गेलेला काळ आणि आपले संबंध मी विसरू शकणार नाही. परंतु येणाऱ्या काळात आपण काही तरी चांगले या देशासाठी आणि राज्यासाठी कराल ही सदिच्छा आणि भावना आहे.