मुंबई: भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठित आरोपी सापडल्यास त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे. ही चित्रा वाघ यांची जुनी मोडस ऑपरेंडी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आशा मिरगे (Asha Mirge) यांनी केला. चित्रा वाघ या महिला अत्याचाराच्या निवडक प्रकरणांमध्येच लक्ष घालतात. या प्रकरणांमध्ये आरोपी पदाने आणि प्रतिष्ठेने मोठा असतो. अशावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) या पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करतात. वेळ पडली तर त्या आरोपींकडून खंडणी वसूल करतात. त्यानंतर या प्रकरणाचं काय करायचं, हा निर्णय चित्रा वाघ घेतात. फार पूर्वीपासूनच चित्रा वाघ अशाच मोडस ऑपरेंडीने काम करत आल्या आहेत, असे आशा मिरगे यांनी म्हटले. त्या गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही : चित्रा वाघ
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी म्हटले की, मला भाजपमधील दोन-तीन अशा स्त्रिया माहिती आहेत की, ज्यांना स्त्री म्हणणे हाच महिलांचा अपमान आहे. महिला अत्याचाराचा कोणीही गैरवापर करू नये. काही लोक पद, प्रतिष्ठा आणि स्वत:ला मोठे करण्यासाठी असे प्रकार करतात. अशा लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले.

‘चित्रा वाघ महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा वापर स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी करतात’

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्या आशा मिरगे यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना मुलीने इमारतीवरून उडी मारल्याचे कसे माहिती झाले? या प्रकरणात पीडित मुलीची ओळख उघड करायची नाही, असा नियम असूनही चित्रा वाघ वारंवार पत्रकार परिषदांमध्ये पिडीतेचे नाव घेत होत्या. त्यांनी फार सफाईदारपणे प्रसारमाध्यमांना या सगळ्यात गुंतवून ठेवले होते. या सगळ्यानंतर पीडितेचे आई-वडील माझ्याकडे आले होते. आम्हाला न्याय हवाय, पण आमच्या जखमांचा बाजार मांडायचा नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे आशा मिरगे यांनी सांगितले.
Raghunath Kuchik : रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेणार, पीडित तरुणीचा मोठा निर्णय
रघुनाथ कुचिक प्रकरणातही चित्रा वाघ या सातत्याने पीडितेला कोणी मदत केलीच नाही, असे सांगत होत्या. पण मुळात शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली होती. या समजात मुलींवर अत्याचार होऊच नयेत. पण तशी वेळ आलीच तर त्या प्रकरणांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. पण या प्रकरणांचा वापर स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा खंडणी वसूल करण्यासाठी होत असेल तर आम्ही त्याचा धिक्कार करतो, अशी भावना आशा मिरगे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here