मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा आज, गुरुवारी वांद्रेतील पाली हिलमधील वास्तू अपार्टमेंटमध्ये पार पडला. या विवाहाच्या विधींना बुधवारीच सुरुवात झाली होती. या लग्न सोहळ्यासाठी कपूर आणि भट्ट कुटुंबियांची उपस्थिती होती. लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर लिक होऊ नयेत म्हणून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली होती. सुरक्षा रक्षकांच्या मोबाइलवरही लाल स्टिकर लावण्यात आले होते. लग्नानंतर काही तासांत आलियानं तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
आलियानं लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. या सर्वात एका व्यक्तीच्या शुभेच्छा प्रचंड चर्चेत आल्या आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ. कतरिनानं आलियाच्या फोटोवर कमेंट करत लग्नाबद्दल अभिनंदन केलंय तसंच शुभेच्छाही दिल्या. ‘तुमच्या दोघांचं अभिनंदन, खूप प्रेम’ असं कतरिनानं म्हटलं आहे.
कतरिना देखील काही महिन्यांपूर्वी अभिनेता विकी कौशल सोबत विवाहबंधनात अडकली.
पांढऱ्याशुभ्र पेहरावातल्या फोटोंमध्ये नवरा-नवरी देखणे दिसत होते. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसह इंडस्ट्रीतल्या काही सेलिब्रिटींनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. लग्नापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं चित्रीकरण या दोघांनी पूर्ण केल्यानं ‘मिस्टर अँड मिसेस कपूर’ यांचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट ठरणार आहे.