यावेळी संजय राऊत यांनी भाजप आमदार संजय कुटे यांनी जळगावमध्ये केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्याबाबत दिलेला निर्णय हा १०० टक्के दिलासा घोटाळा आहे. विशिष्ट राजकीय पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या लोकांना दिलासा देण्यासाठी न्यायव्यवस्था काम करतेय का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात समजले जाणारे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडून करू शकत नाही, त्या आम्ही न्यायालयाकडून करून घेतो. न्यायालयात आमचे वजन आहे. भाजप नेत्यांना मिळत असलेला दिलासा पाहता ते वजन कसले आहे, हे आम्ही पाहत आहोत. दिशा सालियन, मुंबै बँक ते आयएनएस विक्रांत घोटाळा अशा सर्व प्रकरणांमध्ये भाजप नेत्यांना रांगेने दिलासा मिळत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे किंवा न्यायव्यवस्थेत आपल्या विचारसरणीची लोकं बसवण्यात आली आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशाने देशाची लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
‘न्यायव्यवस्थेने डोळ्यांवर पट्टी बांधलेय, पण त्याला एक छिद्र पडलंय’
संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेच्या कारभाराबाबत खोचक टिप्पणीही केली. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. पण त्या पट्टीला एक छिद्र पडले आहे. या छिद्रातून न्यायव्यवस्था आपल्या विचारसरणीच्या लोकांकडे पाहत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्यावर बेईमानीचा ठपका ठेऊनही उच्च न्यायालय पुरावे कुठे आहेत, अशी विचारणा करते, असे संजय राऊत यांनी म्हटले.