अकोल्यात दोन रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली होती. त्याचे अहवाल आले आहेत. प्रशासनाने एकूण १४८जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १०९ जणांचे अहवाल आले असून त्यापैकी एकूण ९ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण ९ करोना रुग्णांपैकी सात जणांचे अहवाल आज आले. हे सर्वच्या सर्व नऊजण वाशिममधील एका करोना रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं.
दरम्यान, जिल्ह्यात सात करोना रुग्ण सापडल्याने अकोल्यातील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अकोल्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या ठिकाणी करोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून करोनाबाधितांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच अकोल्यातील जिल्हा रुग्णालयांची पाहणी करण्यात आली असून करोनाबाधितांसाठी विशेष वॉर्ड करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times