रॉकी भाई… बस नाम ही काफी है… ही ललकारी आज केवळ कर्नाटक नव्हे, दक्षिण भारत नव्हे तर संपूर्ण देशभर ऐकू येतेय. काही वर्षांपूर्वी ‘बाहुबली’ सिनेमाच्या निमित्तानं; नव्या देशव्यापी मनोरंजनविश्वाचा पाया उभारला गेला. त्यावर ‘काला’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ’, ‘कबाली’, ‘मारी २’, ‘विक्रम वेधा’, ‘साहो’, ‘मास्टर’, ‘जय भीम’, ‘सुराई पोतरु’सारख्या सिनेमांचे भक्कम खांब उभे राहिले आणि त्यावर आता ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’ यांसारख्या सिनेमांच्या निमित्तानं वरचा मजला बांधला जातोय. परिणामी मनोरंजनाचा ‘स्कायस्क्रॅपर’ लवकरच दक्षिण भारतात उभी राहिल्यास वावगं वाटायला नको. दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांचा हा अश्वमेध यज्ञ रंजनाच्या नव्या ‘पटकथा’ रचना आणि मनोरंजनासाठीची भव्य कल्पनादृष्टी आगामी काळात प्रेक्षकांसमोर उभी करणार; यात काही दुमत नाही. ‘केजीएफ २’च्या पटकथेची रचना आणि त्याचा विस्तार प्रेक्षकांना सिनेमात पूर्ण वेळ गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

ही कथा तुमची.. आमची.. आपल्या आजूबाजूची.. यापूर्वी आपण ऐकलेलीच आहे. पण, ही कथा सूचकतेनं, भव्यतेनं आणि रंजकनेतं दिग्दर्शक प्रशांत नीलनं पडद्यावर मांडली आहे. कथानकातील खलनायक अधिरा () केजीएफच्या साम्राज्यावर चालून येतो आणि क्षणार्धातच सर्वांचा मसीहा असलेल्या रॉकी भाईला () छातीत गोळी मारतो. आता कथानकात पुढे काय होणार? सिनेमाच्या नायकाला गोळी कशी लागू शकते? कथानक पुढे कसं जाणार? हीच रंजक गंमत दिग्दर्शकानं प्रेक्षकांबरोबर केलीय. परिणामी सिनेमा पाहताना आपण सतर्क होऊन खुर्चीवर खिळून राहतो. लेखक-दिग्दर्शकानं कथानकात केलेल्या कल्पनाविस्तारावर वास्तविकदृष्ट्या कितपत विश्वास ठेवावा? हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु, ‘केजीएफ’ सिनेमाच्या विश्वात लेखक वेळोवेळी दाखले देत ‘रॉकी’ची गोष्ट आपल्यासमोर शिताफीनं मांडतो.

लहानपणी परिस्थिती आणि अन्यायानं पिचलेला-दबलेला यश आता स्वाभिमानानं मान ताठ करुन चालतोय. निडर होऊन स्वतः जगतजेत्ता होण्याचं स्वप्न तो बाळगून आहे. गरिबीमुळे आई गमावलेला यश; त्याच्या आईला दिलेल्या एका वचनासाठी स्वतःचं मोठं साम्राज्य उभं करु पाहतोय. केजीएफ ही सोन्याची खाण मिळवण्यासाठी आणि स्वतःकडेच अबाधित ठेवण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू आहे. ‘जो नडला त्याला फोडला’ हेच त्याचं सूत्र आहे. कामगारांचा आणि गरिबांचा मसिहा असलेल्या रॉकी भाईला कोण धारातीर्थी पाडेल? सोन्याची लंका असलेल्या केजीएफचं साम्राज्य कसं मातीमोल होतं? ते तसं का होतं? या सगळ्यांची उत्तर सिनेमात टप्याटप्यानं आपल्याला मिळत जातात आणि आपण अवाक होतो. ‘एंड इज बीगिनिंग… अँड बीगिनिंग इज एंड’ असं चक्रव्यूह पटकथेत दिसतं. परिणामी कथानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भूतकाळ आणि भविष्याचे पाश जोडलेले आहेत. ज्यामुळे कथानकाचा विस्तार अधांतरी वाटत नाही.

निर्मितीमूल्य, सिने तंत्रज्ञान, कुशल लेखन-दिग्दर्शन आणि दमदार अभिनय या सर्व सूचींमध्ये सिनेमा उमदा आहे. रॉकीच्या भूमिकेत असलेल्या यशनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं त्याच्या कामातून जिंकली आहेत. रॉकी या व्यक्तिरेखेचा निडर पण मिश्किल स्वभाव प्रेक्षकांना त्याच्याशी जोडतो. काही दृश्यांमधली त्याची विनोदी शैलीदेखील स्मरणात राहते. सिनेमातील साहसी दृश्यं उत्कृष्टरित्या दिग्दर्शित आणि चित्रित करण्यात आले आहेत. व्यक्तिरेखांची लांब रांग कथानकात आहे. परंतु, दिग्दर्शकानं प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखेला तितक्याच बारकाईनं पडद्यावर उभं केलंय. त्यामुळे केजीएफच्या वस्तीतील लहान मुलगाही लक्षात राहतो आणि खुर्चीवर बसलेले राजकारणीदेखील. सिनेमाच्या उत्तरार्धातील रंजक वळण ‘पैसा वसूल’ करणारं आहे. तसंच कथानकात नवे प्रश्न उभं करणारंदेखील आहे. त्यामुळे पुन्हा आता ‘केजीएफ चॅप्टर ३’ बघण्याची तयारीदेखील प्रेक्षकांनी ठेवायला हवी.

अधिराच्या भूमिकेत असलेल्या संजय दत्तचं विशेष कौतुक करायला हवं. त्याचा अभिनिवेश लक्षात राहणारा आहे. त्याची कामाप्रती असलेली जिद्द यावेळी सिनेमात दिसून आली. सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना तो कर्करोगाशीदेखील लढा देत होता. त्या परिस्थितीत त्यानं चित्रीकरण पूर्ण केलं; हे विशेष. दुसरीकडे पंतप्रधान रामिक सेनच्या भूमिकेत असलेल्या रविना टंडननं प्रत्येक बॉलवर अभिनयाचे चौकार-षटकार मारले आहेत. सिनेमात तिची व्यक्तिरेखा फार लांबीची नाही. तरीदेखील तिनं स्वतःच्या अभिनयाची बलस्थानं सिद्ध केली आहेत. या सगळ्यात सिनेमाच्या परिणामकारकतेत सिनेसंगीताचा आणि पार्श्वसंगीताचा मोठा वाटा आहे. हा प्रतिशोधाचा, महत्त्वाकांक्षेचा ‘यश’पट जरुर पाहावा असा आहे.

सिनेमा : केजीएफ : चॅप्टर २ (हिंदी)

निर्मिती : होम्बाले फिल्म्स

लेखन-दिग्दर्शन : प्रशांत नील

कलाकार : यश, संजय दत्त, , ,

छायांकन : भुवन गौडा

संकलन : उज्वल कुलकर्णी

संगीत : रवी बसरूर

दर्जा : चार स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here