राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रभागात मशिदींमसोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे यांच्यावर राज ठाकरे नाराजी असल्याची चर्चा होती. याच वादातून वसंत मोरे हे पक्षातून बाहेर पडणार, अशी शक्यताही वर्तविली जात होती. परंतु, गेल्या आठवड्यात वसंत मोरे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर या सगळ्या वादावर पडदा पडला होता. परंतु, पुण्यातील हनुमान चालिसा कार्यक्रमाला वसंत मोरे उपस्थित राहणार नाहीत, या चर्चेने पुन्हा एकदा मनसेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, आता वसंत मोरे यांनी आपण या कार्यमक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.
नेमका काय वाद?
मनसेचे नेते अजय शिंदे आणि वसंत मोरे यांचे फारसे पटत नसल्याच्या बातम्या सातत्याने ऐकायला मिळत असतात. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणारा पुण्यातील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम अजय शिंदे यांनी आयोजित केला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी याठिकाणी जाण्यास नकार दिल्याची चर्चा होती. मला या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, तसेच तो मनसेचा कार्यक्रम नाही, असे वसंत मोरे बोलल्याचे सांगितले जात होते.