औरंगाबाद: जीवघेण्या करोनापासून नागरिकांचा जीव वाचावा आणि त्यांनी घराबाहेर पडू नये म्हणून घरादार सोडून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच दुचाकीस्वारांनी लाठीहल्ला केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

संचारबंदी निमित्त शहराचं प्रवेशद्वार असलेल्या दिल्ली गेटजवळील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांनी आज विशेष नाकाबंदी सुरू केली होती. आज दुपारी वाहतूक शाखेचे पोलीस जनार्दन जाधव आणि जोनावल हे दोघेही पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत नाकाबंदी करत होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण ट्रिपल सीट येऊन त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. संचारबंदीत वाहने चालविण्यास मनाई असतानाही ट्रिपल सीट जात असलेल्या या दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या तावडीतून पळण्यात हे तिघेही यशस्वी झाले. मात्र धक्कादायकबाब म्हणजे थोड्यावेळाने हे तरुण तोंडाला मास्क लावून आणखी काही तरुणांना घेऊन साठे चौकात आले आणि त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

आम्हाला तुम्ही अडवलेच का? असा सवाल करत या तरुणांनी पोलिसांशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना संचारबंदी लागू असल्याचं सांगतानाच वाहतूक नियम मोडल्यामुळेच तुम्हाला अडवल्याचं या तरुणांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका तरुणाने पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून पोलिसांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना मारहाण सुरू झाल्याने महिला पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही हे हल्लेखोर थांबले नाहीत. पोलिसांवर लाठीहल्ला केल्यानंतर या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील दोघांना अटक केली असून फिरोज फारुख हा यातील मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे औरंगाबादेत संतापाची लाट पसरली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here