मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी ‘वास्तू’ इथं गुरुवारी, १४ एप्रिल रोजी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील अत्यंत जवळचे नातेवाईक आणि दोघांचे खास मित्रमंडळी उपस्थित होते. थाटामाटात झालेल्या या लग्नसोहळ्यावेळी रणबीरला त्याच्या वडिलांची प्रकर्षानं आठवण येणं स्वाभाविक होतं. त्यामुळेच रणबीरनं आपल्या वडिलांची आठवण म्हणून त्यांची एक खास गोष्ट लग्नावेळी आवर्जून घातली होती. ही वस्तू म्हणजे ऋषी कपूर कायम वापरायचे ते घड्याळ.

रणबीरनं घातल ऋषी कपूर यांचं घड्याळ

रणबीरसाठी ऋषी यांचं हे घड्याळ लाखमोलाचं होतं. अर्थात ऋषी कपूर हे जे घड्याळ वापरायचे खऱ्या अर्थानं लाखमोलाचं होतं कारण त्याची किंमत २१ लाख रुपये इतकी होती. या घड्याळाला निळ्या रंगाचा पट्टा होता आणि ते घड्याळ १८ कॅरेटच्या पांढऱ्या सोन्यापासून (प्लॅटिनम) बनवलेलं आहे.

लग्नानंतर आलिया-रणबीर झाले मालामाल; दोघांची एकूण संपत्ती काही शे कोटी!

आलिया भट्टचा ड्रेस देखील होता खास

आलिया भट्टनं लग्नसोहळ्यावेळी परिधान केलेला ड्रेस देखील खास होता. आलियानं घातलेला हा ड्रेस तिच्या आणि रणबीरमधील खास नातं दाखवणारा होता. रणबीरचा लकी नंबर ८ असून ते तिच्या मंगळसूत्रामध्ये होतं. तसंच तिच्या पदरामध्ये त्यांच्या लग्नाची तारीख विणली होती. आलियानं तिच्या नववधूच्या वेशभूषेमध्ये काही बदल केले होते. आलिया आणि रणबीर हे पाच वर्ष रिलेशनमध्ये होते. या दोघांनी आयुष्यातील अनेक रोमँटिक क्षण पाली हिल येथील त्यांच्या घरातील बाल्कनीमध्ये घालवले आहेत. त्यामुळे याच घरात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.


आलियानं इन्स्टावर लिहिली खास पोस्ट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं लग्नानंतर सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी, भावुक अशी पोस्ट शेअर करत लग्नाची बातम्या चाहत्यांनी दिली. तिनं पोस्टमध्ये लिहिलं की, ‘ आज आमच्या सभोवताली आमच्या कुटुंबातील जवळचे नातलग आणि जवळचे मित्रमंडळी आहेत. आम्ही सर्वजण आमच्या दोघांच्याही सर्वात आवडत्या जागी आहोत. ही जागा आहे आमच्या घराची आवडती बाल्कनी. याच बाल्कनीमध्ये गेली पाच वर्ष आम्ही घालवली आहेत. इथं आम्ही आज लग्न देखील केलं आहे. आम्ही काही वर्षांपासून एकत्र आहोत. त्या वर्षांच्या अनेक सुंदर आठवणी आमच्याबरोबर आहेत.’

‘ज्या हातांनी तुला चालायला शिकवलं..’ आलिया भट्टच्या बॉडीगार्डचा मेसेज होतोय व्हायरल

ती पुढे लिहिते,’इथंच आम्ही एकमेकांवर प्रेम केलं. एकमेकांसोबत हसलो. इथंच आम्ही शांतता देखील अनुभवली. इथंच आम्ही रात्रीचे सिनेमे देखील पाहिले. याच जागेमध्ये आम्ही क्षुल्लक गोष्टींवरून वेड्यासारखे भांडलो. इतकंच नाही तर याच जागेमध्ये आम्ही वाईनचे घोट घेत चायनीज पदार्थांचाही आस्वाद घेतला आहे. आमच्या दोघांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आणि आमच्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सर्वांनी मिळून आमचे हे क्षण अधिक खास केले आहेत.’


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न कोणत्याही परीकथेपेक्षा कमी नव्हती. या लग्नामध्ये सगळं काही होतं जे एखाद्या परीकथेमध्ये असतं. रणबीर आणि आलिया लग्नाच्या वेशभूषेमध्ये खूप सुंदर दिसत होते. त्यांचे चाहते त्यांना या रूपात पाहून खूपच आनंदित झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here