पुणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ‘मी १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी औरंगाबाद इथं जाहीर सभा घेणार आहे आणि त्यानंतर ५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. तसंच यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांवर पुन्हा एकदा आक्रमक इशारा दिला आहे. (Raj Thackeray News)

‘मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

हनुमान चालिसा आणि महाआरतीवरून मनसेच्या नेत्याने आदित्य ठाकरेंना डिवचलं!

शोभायात्रांवर होणाऱ्या दगडफेकींवरून इशारा

रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या घटनांवरूनही राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ‘तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातात द्यायला लावू नका. शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या आरोपावर बोलणं टाळलं

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘हिंदू ओवेसी’ असं म्हणत राज ठाकरे यांचा समाचार घेतला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, ‘मी आता पुन्हा लवंड्यांवर बोलू इच्छित नाही.’

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून मागे हटणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने आगामी काळात मनसेचा पोलीस प्रशासनासोबत संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here