म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने शिवसेनेविरोधात भाजप आणि मनसेने गेल्या काही दिवसांपासून आघाडी उघडलेली दिसते. याचाच पुढचा भाग म्हणून आता १ मे या महाराष्ट्रदिनी मनसेने औरंगाबाद येथे, तर भाजपने मुंबईमध्ये सभेचे आयोजन केले आहे. या सभांमधून मनसेकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि भाजपकडून राज्यातील प्रशासन व मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभारावरून सेनेला लक्ष्य केले जाणार असल्याचे कळते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भोंगे उतरवण्याबाबतची भूमिका याआधी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मांडली होती. मात्र आता राज्याचे प्रमुख म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश असल्याने उद्धव यांना भोंग्यासंदर्भात कोणतीही भूमिका घेताना या पक्षांशी चर्चा करावी लागणार आहे. एकूणच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना भोंग्याविरोधात भाष्य करीत मनसेने सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेविरोधात भाजप आणि मनसे अशी अधिकृत युती अद्याप झाली नसली तरी दोन्ही पक्षांकडून सध्या हाताळले जात असलेले राजकीय मुद्दे पाहता पडद्यामागे त्यांच्यात काही ठरले आहे का, याविषयी जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीयवादी राजकारण केल्याचा आरोप सातत्याने करीत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कशी हिंदुत्वापासून लांब जात आहेत, याकडेही हे दोन्ही नेते इतरांचे लक्ष वेधत आहेत. मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबतची भूमिका राज यांनी याआधीच वारंवार जाहीर केली आहे. मात्र आता अलिकडेच भाजपने ही भूमिका पुन्हा उचलून धरल्यानंतर त्यांनी त्यांच्या आधीच्या भूमिकेवर जोर द्यायला सुरुवात केल्याचे दिसते.

महाराष्ट्रदिनी पोलखोल अभियान

१ मे रोजी राज यांनी औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्यात महाआरती आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमानंतर आता औरंगाबाद येथे होणाऱ्या या सभेत शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा लक्ष्य केले जाणार असल्याचे कळते. या दिवसाचा मुहूर्त साधून फडणवीस मुंबईतील सभेत शिवसेनेवर आरोपांची तोफ डागणार असल्याचे समजते. भाजपकडून यावेळी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात पोलखोल अभियानाची सुरुवात केली जाणार असल्याचेही सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here