तांबापुरा परिसरातील एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच तांबापुरा परिसरातून त्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा खून त्याचा साथीदार दुलेश्वर उर्फ आनंद माळी याच्यासोबत केल्याची कबुली दिली.
मद्यप्राशन का करता असे दोघांना हटकणे बेतले जीवावर…
मेहरुण तलाव परिसरातील डॉ. जैन यांच्या फार्म हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मयत दिनेश पाटील हे झाडाखाली दारु पित होते. तिथेच थोड्या अंतरावर दुलेश्वर उर्फ आनंद माळी हा देखील अल्पवयीन मुलासह दारु पित होते. यावेळी दिनेश यांनी त्या दोघांना उद्देशून लहान असून दारु का पित आहेत असे हटकले. आणि हेच हटकणे दिनेश पाटील यांच्या जिवावर बेतले. बोलण्याचा राग मनात ठेवून त्या दोघांनी दिनेश यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांची निर्घूण हत्या केली. अशी कबुली दोघांनी अटकेनंतर पोलिसांना दिली. दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संशयित आनंद माळी यास रविवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या पथकाने लावला खुनाचा छडा…
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, राहूल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, भारत पाटील, विजय चौधरी, दर्शन ढाकणे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दिवस-रात्र मेहनत करत या गुन्ह्याचा छडा लावला व दोघांना अटक केली.