मुंबई: मुख्यमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सर्व १७० हून अधिक पोलिसांचा करोनाकरिता चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं महापालिका आणि पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’ ज्या ठिकाणी आहे, त्या कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या टपरीवरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
मातोश्री निवासस्थान वांद्रे पूर्व येथील कलानगरात आहे. या कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून जवळच ही चहाची टपरी आहे. तेथील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. चहाच्या टपरीवर नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेव्यवस्थेतील काही पोलीस कर्मचारी हे या टपरीवर चहा पिण्यासाठी जात असतात. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यामुळं खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील सर्व म्हणजेच १७० हून अधिक पोलिसांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, त्यांना अद्याप आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times