अमरावती : जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणार्या अचलपूरात काल झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये भांडणं झाली. याच पार्श्वभूमीवर या भागाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने पुन्हा परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती देतांना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणाले की, ‘सध्या शहरात संचारबंदी आहे. कुठल्याही कारणासाठी कोणीही शहरात प्रवेश करू शकत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे.’
यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी म्हणाल्या की, या दुल्हा गेटवर विविध समाजाचे लोक आपल्या सण समारंभावर झेंडे लावतात. मात्र, काल काही समाजकंटकांनी हा झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. पोलिसांनी अनेक निर्दोष तरूणांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले आहे. या कसोटीच्या काळात हिंदूंना दिलासा देण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवले हा आमच्यासोबत केलेला भेदभाव आहे, असं निवेदिता चौधरी म्हणाल्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे काल झेंडा काढल्याचा वाद विकोपाला गेला आणि काही वेळात गटमार सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.